नवी दिल्ली, दि. १७
भारतातील जैन तीर्थक्षेत्रे, सिद्धक्षेत्रे, अतिशय क्षेत्रे आणि प्राचीन मंदिरांचे संरक्षण आता फक्त भावनिक नाही, तर कायदेशीरदृष्ट्या देखील अत्यंत गंभीर बाब बनले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण, तोडफोड आणि वादाच्या घटना वाढत असताना भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीने देशभरातील सर्व मंदिरे, संस्था आणि ट्रस्ट्ना तातडीने कायदेशीर दस्तऐवज पूर्ण आणि अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.
कमेटीच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपये खर्च करून मंदिर उभारणी किंवा जीर्णोद्धार केल्यानंतरही, ट्रस्ट डीड, पॅन कार्ड, देवस्थान विभागाची नोंदणी आणि जमिनीचे मूळ मालकी हक्काचे कागदपत्रे नसल्यामुळे अनेक ठिकाणी कायदेशीर लढा देणे अशक्य होत आहे. परिणामी मंदिरे, धर्मशाळा, संत भवन आणि पाठशाळा यांच्या जमिनींवर अतिक्रमण होत असते. केवळ इमारत उभी राहिल्याने संस्कृती जिवंत राहत नाही, तिचे कायदेशीर संरक्षणही तितकेच आवश्यक आहे” – असे स्पष्ट मत कमेटीने व्यक्त केले आहे. देशभरातील हजारो तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि धार्मिक संस्था सध्या या कायदेशीर दुर्लक्षामुळे धोक्यात असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कमेटीने सर्व जैन समाज, ट्रस्ट आणि मंदिर समित्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
कमेटीने अधोरेखित केलेले महत्त्वाचे मुद्दे:
जुनी तीर्थक्षेत्रे व सिद्धक्षेत्रांच्या जमिनी खातेदाराच्या नावावर नोंदवून ट्रस्ट डीड व पॅन कार्ड तयार करणे अनिवार्य
नवीन मंदिरांसाठी जमिनीचे मूळ दस्तऐवज सुरक्षित ठेवणे आणि ट्रस्टची नोंदणी त्वरित पूर्ण करणे
समाजाच्या मालकीची जमीन धार्मिक/परमार्थिक कार्यासाठी वापरात असल्यास तिचेही कायदेशीर दस्तऐवज पूर्ण करणे
शासनाच्या अधिग्रहण प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठीही ट्रस्ट डीड व पॅन अनिवार्य
समिती बदलताना सर्व कागदपत्रे पारदर्शकपणे नव्या समितीला हस्तांतरित करणे

