पालकमंत्र्यांकडे धडक मागणी;
सोलापूर, दि. २०
महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला असतानाही, जैन समाजाच्या मोठ्या योगदानानंतरही महापालिकेत समाजाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. यामुळे समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडता येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. समाजाच्या विकास आणि प्रश्नांसाठी किमान एक स्वीकृत नगरसेवक असणे ही काळाची गरज असल्याचे मत सकल जैन समाजाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (१९ जानेवारी २०२६) सायंकाळी ५ वाजता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जैन समाजाच्या शिष्टमंडळाने नियोजन भवन, नवीन कलेक्टर कार्यालयाजवळील दूध डेअरी, सात रस्ता येथे निवेदन सादर केले. याशिवाय भाजप शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनाही निवेदन देण्यात आले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि पक्षाच्या आदेशानुसार प्रभाग २५ (ब) मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्याम पाटील यांनी पक्षशिस्त पाळत उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पक्षाने जैन समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी श्याम पाटील यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात कुमठे चंद्रप्रभू जैन मंदिराचे अध्यक्ष श्याम पाटील, भाजप शहर उपाध्यक्ष साधनाताई संगवे, भारतीय जैन संघटनेचे अभिनंदन विभूते, वालचंद पाटील, ज्ञानदीप कासार, महामंडळाच्या स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, ब्रह्मदेवदादा माने, सहकारी बँकेच्या संचालिका प्रिया पाटील, हिराचंद कासार, उद्योजक संकेत मेहता, राम पाटील, विक्रांत बशेट्टी, ओम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जैन समाजाच्या या ठाम मागणीमुळे महापालिकेत समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि विकासासाठी एक सक्षम प्रतिनिधी कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पालकमंत्री आणि पक्षाकडून यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, अशी अपेक्षा जैन समाजाच्या या शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केली.

