एकविसाव्या शतकात जैन समाज अंधश्रद्धेच्या विळख्यात?

पुणे, दि. २१

विज्ञान, तर्क आणि विवेक यांचा पुरस्कार करणारा जैन धर्म आज अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या प्रभावाखाली जात असल्याची गंभीर चिंता जैन समाजातील विचारवंत आणि अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. भगवान आदिनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसा, अनेकांतवाद, आत्मशुद्धी आणि कर्मसिद्धांत या मूलभूत तत्त्वांपासून समाज हळूहळू दूर सरकत असल्याचे चित्र दिसत आहे.

आज जैन समाजातील मोठ्या वर्गाने वैदिक परंपरेतील सत्यनारायण पूजा, दत्त जयंती, ग्रहदोष, कालसर्प, पितृदोष आदी कर्मकांडांमध्ये गुंतकाम केले आहे. विवाह, नोकरी, संतती आणि आर्थिक लाभासाठी शिर्डी, शेगाव, अक्कलकोट यांसारख्या ठिकाणी नवस-साकडे घालण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब जैन तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे विसंगत असल्याचे मत अनेक जैन विचारवंत मांडत आहेत.
जैन धर्माचा केंद्रबिंदू असलेला णमोकार मंत्र कोणत्याही देवतेचे नामस्मरण करत नाही, तर अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधूंना नमन करतो. तीर्थंकर मोक्षदाता नसून मोक्षमार्गदर्शक आहेत आणि प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मांनुसार फळ भोगतो, ही कर्मसिद्धांताची स्पष्ट भूमिका आहे. तरीही “सर्व काही देव करतो” ही संकल्पना समाजात रुजत असल्याने जैन धर्माच्या स्वतंत्र ओळखीला धक्का बसत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, जैन धर्माला सनातन किंवा वैदिक धर्माची शाखा ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही होत आहे. इतिहास साक्ष देतो की जैन धर्म हा भारतातील प्राचीन, स्वतंत्र आणि श्रमण परंपरेतून विकसित झालेला आहे. गिरनार, शिखरजी, पालिताना यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांवर होणारे वाद आणि अतिक्रमण यामुळे समाजाने अधिक जागरूक राहणे गरजेचे झाले आहे. मंदिरांमध्ये ज्येष्ठांची उपस्थिती असली तरी तरुणांची संख्या कमी होत चालली आहे. वाचनसंस्कृती घटत असून वैचारिक संवाद कमी झाला आहे. सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडणाऱ्या सुशिक्षित तरुणांमध्येही जैन इतिहास आणि तत्त्वज्ञानाबाबत अपुरी माहिती दिसते.

जैन तत्त्वज्ञान विज्ञानसुसंगत असून, सृष्टी अनादी-अनंत आहे, ईश्वर निर्माता नाही आणि प्रत्येक जीव कर्मांचा कर्ता आहे, ही भूमिका आधुनिक वैज्ञानिक विचारांशी जुळते. अनेकांतवाद आजच्या सहिष्णु समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जैन समाजाने अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मपरीक्षण, समाजप्रबोधन, अभ्यासवर्ग आणि शास्त्रीय चर्चा आवश्यक आहे. सर्व पंथ, संघटना, अभ्यासक आणि तरुणांनी एकत्र येऊन जैन धर्माचे स्वतंत्र अस्तित्व, तत्त्वज्ञान आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. अहिंसा, विवेक आणि आत्मबोधाच्या मार्गावर परतणे हेच समाजाच्या भविष्यासाठी हितावह ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मयूर मल्लिनाथ वग्यानी, सांगली