फलटणमध्ये जैन भाविकांचा कमालीचा उत्साह;

श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिराची भव्य रथयात्रा ३१ जानेवारीला;

नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद आणि धार्मिक विधींचा उत्सव

फलटण दि. २३

फलटण शहरातील नवी पेठ परिसरातील श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक रथयात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात साजरा होणार आहे. शनिवार (दि. ३१ ) हा भव्य सोहळा पार पडणार असून, जैन धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन दिगंबर जैन समाज, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नादिमंगल, ध्वजारोहण आणि अभिषेक पूजा विधीने होईल. मंदिर परिसर धर्मध्वज, फुलांची सजावट आणि आकर्षक रंगीबेरंगी सज्जतेने नटलेला असेल. त्यानंतर श्री १००८ भगवान चंद्रप्रभ स्वामी भव्य रथात विराजमान होऊन शहरात नगरप्रदक्षिणा करणार आहेत. ही मिरवणूक फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांतून जाणार असून, भाविकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. दुपारी साधारण ३.०० वाजता शांतिनिकेतन, हरिनारायण टेकडीजवळ चढावा, अभिषेक पूजा, शांतिधारा आणि इतर धार्मिक विधी संपन्न होतील. याशिवाय रथयात्रे निमित्त सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसाद गुणवरेकर परिवाराकडून आयोजित करण्यात आला आहे. हा महाप्रसाद नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे होणार असून, त्याचे आयोजन सम्राट गुणाकर परिवार, फलटण यांच्या वतीने करण्यात येत आहे.
या पावन प्रसंगी जैन धर्मातील श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचे सुंदर दर्शन घडणार असून, भाविकांना आध्यात्मिक उर्जा आणि पुण्यलाभ मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. रथयात्रा महोत्सवात सहभागी होऊन भगवान चंद्रप्रभ प्रभूंच्या चरणी श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व जैन बांधव-बहिणींना आयोजकांकडून हार्दिक निमंत्रण देण्यात आले आहे.
फलटण शहरात दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हजारो भाविकांचा सहभाग अपेक्षित असून, शहरात धार्मिक वातावरण निर्माण होणार आहे.