‘मरावे परी अवयवरूपी उरावे’चा प्रत्यय; डॉ. राधिका शहायांच्या मरणोत्तर अवयवदानाने सहा जणांना दिले नवजीवन; 

शहा परिवाराचा आदर्शवत निर्णय, डॉ. विकास शहा यांचे भावपूर्ण उद्गार

इंदापूर, दि. २३ 

इंदापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. राधिका संदेश शहा यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पती डॉ. संदेश शहा आणि शहा परिवाराने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला. या उदात्त कृतीमुळे सहा जणांना नवे जीवन मिळाले असून, दुःखाच्या प्रसंगीही इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा निर्णय जैन समाजासह संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

वालचंदनगर सन्मती मंडळाच्या वतीने डॉ. राधिका शहा यांच्या या मरणोत्तर अवयवदानाबद्दल त्यांचे पती डॉ. संदेश शहा आणि मोठे दीर जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा म्हणाले, “मरणोत्तर अवयवदान हे मानवजातीचे सर्वश्रेष्ठ दान आहे. शहा परिवाराने आपले दुःख बाजूस ठेवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे, जगा व जगू द्या’ या उक्तीप्रमाणे डॉ. राधिका यांचे जीवन सार्थक झाले. हा आदर्श सर्वांनी घ्यावा.”

कार्यक्रमात मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सशांत गांधी, युवा अध्यक्ष डॉ. चिराग गांधी, महिला अध्यक्ष डॉ. निकिता दोभाडा, सौ. संगीता श्रेणिक शहा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी केले तर सूत्रसंचालन महेश निंबाळकर यांनी केले. यावेळी कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे, हभप उमराव महाराज देवकर, हुमड जैन फेडरेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर, युवा नेते श्रीराज भरणे, नागरी संघर्ष समितीचे संस्थापक कृष्णाजी ताटे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तैय्यब शेख, अमोल भिसे, राष्ट्र सेवा दलाचे गफूरभाई सय्यद आदींनी श्रद्धांजली वाहिली.