२४ जानेवारीला; पालखी मिरवणूक, १०८ अर्घ्य विधान
भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी
अकलूज, दि. २३
अकलूज शहरातील प्रसिद्ध श्री विसाहुमड दिगंबर जैन मंदिर व पंचायती वाडा येथे श्री १००८ भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिराचा ९वा वार्षिक महोत्सव शनिवार, माघ शुद्ध ६, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभाव आणि धार्मिक उत्साहाने साजरा होणार आहे. या पावन प्रसंगी हजारो श्रावक-श्राविका सहभागी होऊन भगवान मुनिसुव्रतनाथ प्रभूंच्या चरणी श्रद्धांजली वाहणार असल्याने शहरात धार्मिक वातावरण दाटले आहे.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहणाने होईल. हा विधी धर्मनुरागी श्री. गंगाराम पद्मश्री गांधी परिवार, अकलूज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजता पालखीमध्ये श्री मुनिसुव्रतनाथ भगवानांची उत्सवमूर्ती ठेवण्याचा मान श्री. शांतिलाल गुलाबचंद गांधी परिवार, अकलूज यांना देण्यात आला आहे. सकाळी ८.०० वाजता भव्य पालखी मिरवणूक निघणार असून, त्यानंतर ८.४५ वाजता पहिल्या मजल्यावरील आणि गर्भगृहातील सर्व मूर्तींचा दातार अभिषेक होईल. दुपारी १२.१५ वाजता श्री १००८ भगवान मुनिसुव्रतनाथ विधान १०८ अर्घ्य हा मुख्य विधी पार पडणार आहे. आयोजकांनी सर्व श्रावक-श्राविकांना पांढरा ड्रेस आणि केशरी साडी परिधान करून जलकुंभ घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्ती आणि धर्मभावना अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या ९व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन श्री विसाहुड दिगंबर जैन मंदिर व पंचायती वाडा, अकलूज येथील सर्व ट्रस्टी आणि संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवाचे अध्यक्ष श्री. इंद्रराज जंबुकुमार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम सुसूत्र आणि भक्तिमय रितीने पार पडणार आहे. जैन समाजातील हा वार्षिक उत्सव अकलूज शहरासाठी विशेष महत्त्वाचा असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

