फलटण मध्ये वसंत पंचमीचा उत्सव;

श्री आदिनाथ-पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात श्री सरस्वती महामंडल विधान,

फलटण (जि. सातारा), दि. २४

फलटण शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील श्री १००८ आदिनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे वसंत पंचमी निमित्त भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा झाला. गुरुवार, २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू झाली आणि संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात पार पडला.

सकाळी भगवंतांचा भव्य पंचामृत अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरात श्री सरस्वती मातेची आकर्षक सजावट करून विशेष पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुपारी १ वाजता श्री सरस्वती महामंडल विधानाचे आयोजन झाले. या विधानात फलटण जैन समाजातील श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या विधानात सौधर्म इंद्र म्हणून अनंतकुमार दोशी व सुनय दोशी यांच्या हस्ते जिनवाणीची विधिवत स्थापना करण्यात आली. १०८ श्रीफल, १०८ नैवेद्य, १०८ गुलाबफुले, विविध फळे आदी साहित्य अर्पण करून विधान पूर्णत्वास गेले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि शांत वातावरणात पार पडला. मंदिर व्यवस्थापनाने सांगितले की, वसंत पंचमी निमित्त मंदिरात दररोज रात्री भक्तामर स्तोत्र पठण होत असून, प्रत्येक रविवारी लहान मुलांसाठी विशेष पंचामृत अभिषेकाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमास पंडित वैभव जैन, मोसमी दोशी, निना दोशी, पायल गांधी, प्रियंका आलोक दोशी, प्रियंका दोशी, सुनय दोशी, अनंतकुमार दोशी, राजेंद्र काळे, प्रणिता दोशी, भूषण दोशी, आलोक दोशी, डॉ. निनाद दोशी तसेच फलटण येथील समस्त महिला मंडळ आणि जैन समाजातील अनेक श्रावक-श्राविका उपस्थित होते.