महातपूर ( जि. सोलापूर), दि. २४
सोलापूर जिल्ह्यातील महातपूर येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या द्वितीय समाधी स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसांचा भव्य धार्मिक महोत्सव सुरू झाला आहे. रविवार २५ जानेवारी ते मंगळवार २७ जानेवारी २०२६ या कालावधीत आचार्य छत्तीसवी विधान आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे होणार असून, राज्यासह देशभरातून हजारो श्रावक-श्राविका दाखल होत आहेत.
या मंगल आयोजनाला पूज्य आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परम प्रभावक शिष्य आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य क्षुल्लक, मुनिराज आणि आर्यिका माताजी यांच्या पावन सान्निध्यात संपूर्ण कार्यक्रम पार पडत आहेत.
महोत्सवातील ठळक कार्यक्रम दररोज अभिषेक, पूजन, आहारचर्या मुनिश्रींची प्रभावी प्रवचने आचार्य छत्तीसवी विधान विशेष महापूजन आणि मंगल आरती सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार २७ जानेवारी रोजी आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष सादरीकरण
बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजन आणि इतर सर्व सोयी आयोजकांकडून उत्तम रितीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या त्रिदिवसीय महोत्सवात सहभागी होऊन आचार्यश्रींच्या विचारांचा आणि तप-त्यागाच्या मार्गाचा लाभ घेण्याची संधी चुकवू नये, असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज, महातपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

