जैन समाजासाठी एक आनंदाची बातमी! आजपासून ‘जैन टुडे’ नावाने एक नवे न्यूज रिपोर्टिंग मराठी माध्यम सुरू होत आहे. या उपक्रमांतर्गत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजही अधिकृतपणे कार्यान्वित होत आहेत. जैन धर्मातील दैनंदिन घडामोडी, पूज्य मुनि-माताजी व आचार्यश्रींच्या प्रवचनांचा सार, त्यांचे चातुर्मास, आहार-विहार यासंबंधीच्या ताज्या बातम्या येथे नियमितपणे प्रसारित केल्या जाणार आहेत.
‘जैन टुडे’चे वैशिष्ट्य म्हणजे केवळ बातम्याच नव्हे, तर जैन धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्रे आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये होणारे अभिषेक, शांतिधारा, पूजन यांचे थेट व्हिडिओ दृश्य यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नित्यनेमाने घडणारे धार्मिक कार्यक्रम – पंचकल्याणक महोत्सव, दिक्षा समारंभ, मंदिर प्रतिष्ठा, पर्युषण-दसलक्षण पर्व यांचा सविस्तर आढावा व्हिडिओ स्टोरी आणि बातम्या स्वरूपात सादर केला जाईल. याशिवाय, जैन धर्माशी संबंधित शासकीय व सरकारी स्तरावरील महत्त्वाचे निर्णय, त्याचे समाजावर होणारे परिणाम आणि लाभ यांचा सखोल अभ्यास करून तो समाजापर्यंत पोहोचवणे हा ‘जैन टुडे’चा मुख्य उद्देश आहे. ‘जैन टुडे’चे खरे वैशिष्ट्य म्हणजे जैन धर्माशी निगडित शासकीय निर्णय, तीर्थक्षेत्रांचे संरक्षण, अल्पसंख्याक दर्जा यासारख्या मुद्द्यांवर सखोल विश्लेषण करून समाजाला जागृत करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. हे माध्यम जैन धर्माच्या या शाश्वत आणि सकारात्मक मूल्यांना जगभर पोहोचवेल.
जैन धर्म हा केवळ एक धर्म नव्हे, तर जीवन जगण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. अहिंसा हे त्याचे मूळ तत्त्व आहे, जे सर्व जीवांना समान मानते आणि हिंसा टाळण्यास प्रेरित करते. यामुळेच जैन समाज कठोर शाकाहारी जीवनशैली अवलंबतो, पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावतो, प्राण्यांचे रक्षण करतो आहे. अपरिग्रह तत्त्व अतिरेकी उपभोग थांबवून साधे जीवन जगण्यास शिकवते, जे आजच्या पर्यावरण संकटात अत्यंत प्रासंगिक आहे. अनेकांतवाद (मल्टिपल व्यूपॉइंट्स) हे तत्त्व सहिष्णुता आणि परस्परसमज वाढवते, समाजातील संघर्ष कमी करते.
जैन समाजाने नेहमीच दानधर्माला प्राधान्य दिले आहे. प्राण्यांसाठी पिंजरा-पोळ, पक्ष्यांसाठी रुग्णालये, गोशाळा आणि मानवांसाठी रुग्णालये, शैक्षणिक संस्था उभारून समाजसेवेचे उदाहरण घालून दिले आहे. हे सकारात्मक योगदान जैन धर्माच्या करुणा, समता आणि आत्मसंयम या मूल्यांमुळे शक्य झाले आहे. जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला अधिक समृद्ध करणारे हे माध्यम निश्चितच समाजमान्य होईल, असा विश्वास ‘जैन टुडे’च्या संचालकांना आहे. जैन बंधू-भगिनींनी या चॅनलला आणि पेजला सबस्क्राइब करून, लाईक करून आणि शेअर करून साथ द्यावी, ही विनंती.
समाज बांधवानी आपल्या परिसरातील धार्मिक तसेच जैन समाजासंबंधी घडामोडी आम्हाला या व्हाट्सअप ९०९६४२३८१४ या क्रमांकावर तसेच jaintodays@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावेत.
टीम : Jain Today

