एक संत, एक देश, एक दीप;

२७ जानेवारीला सायंकाळी लाखो घरांतून एकाच वेळी प्रज्वलित होणार गुरु दीप

नागपूर, दि. २३

जैन समाजाचे जनसामान्यांचे श्रद्धास्थान असलेले संत आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या द्वितीय समाधी स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण देशभर एकाच वेळी ‘विद्यादीपोत्सव’ हा अभिनव आणि भावपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७.३० वाजता देशातील शहरं, नगरं, गावं आणि वाड्यांमधील प्रमुख सार्वजनिक स्थळी तसेच लाखो घरांमध्ये एकाच वेळी हा कार्यक्रम साजरा होणार आहे.

“एक संत, एक देश, एक तारीख, एक वेळ आणि एक दीप” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम गुरुदेवांच्या विराट व्यक्तिमत्त्वाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करणारा ठरणार आहे. कार्यक्रमात मंगल आरती, दीपप्रज्वलन, ‘मेरी भावना’ पाठ, नऊ वेळा नमोकार मंत्र जप आणि गुरुवर्यांच्या राष्ट्रहित चिंतनाचे वाचन यांचा समावेश असेल. प्रत्येक घरातून एक दीप गुरुचरणी अर्पण करून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रेरणा व्यक्त केली जाणार आहे.
या उपक्रमामुळे गुरुदेवांच्या विचारांची – अहिंसा, संयम, शिक्षण, राष्ट्रभक्ती आणि आत्मशुद्धी – ही मूल्ये समाजमनात अधिक गहिरे रुजावीत आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचावीत, असा उद्देश आहे. सध्या देशभरात या कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार वेग आला असून, जैन समाजातील गुरुभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकता दिसत आहे.
‘आप और हम’ या मंचाच्या वतीने आयोजित आणि ‘विद्योदय समूह भारतवर्ष’ यांच्या निवेदनाखाली होणाऱ्या या देशव्यापी विद्यादीपोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे:
९८९३१४४६८४ , ९२००२२३४५३, ९५८४८३९२२८

२७ जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजता तुमच्या शहरात, गावात किंवा घरात एक दीप प्रज्वलित करून आचार्य विद्यासागरजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याची ही अनोखी संधी चुकवू नका!