आचार्य श्री कुंथूसागरजी महाराजांचा णमोकार तीर्थाकडे भव्य विहार सुरू;

पैठण पासून भाविकांच्या भक्तिभावाने निघाली पावन यात्रा

पैठण, दि. २३
जगद्गुरू गणधराचार्य कुंथूसागरजी महाराज यांचा मंगलमय आशीर्वाद सर्व भक्तांना लाभत असताना, संम्मेदाचल कुंथूगिरीचे प्रणेते असलेल्या गुरुदेवांचा अतिशय क्षेत्र पैठण येथून श्री क्षेत्र णमोकार तीर्थाच्या दिशेने विहार आजपासून (दि.२३ जानेवारी २०२६) आनंद आणि भक्तिभावाने सुरू झाला आहे. या पावन यात्रेमुळे पैठणपर्यंतचा परिसर भक्तिमय वातावरणाने नटला असून, हजारो भाविक गुरुदेवांच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी उत्सुकतेने सहभागी होत आहेत. या विहारयात्रेचे संपूर्ण नियोजन बा. ब्र. जयश्री दिदी (संसंघ संचालिका), अजीत जैन आणि लाभेष पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. विविध ठिकाणी भाविकांकडून पादवंदन, सेवा, जलकुंभ आणि इतर सत्काराची व्यवस्था केली जात असून, गुरुदेवांच्या दर्शनाने भाविकांच्या मनात आध्यात्मिक उर्जेचा संचार होत आहे.
आचार्य कुंथूसागरजी महाराज हे जैन समाजातील अत्यंत आदरणीय संत असून, त्यांच्या विहारामुळे परिसरातील जैन बांधव-बहिणींसह इतर धर्मीयांमध्येही भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. णमोकार तीर्थाकडे जाणारा हा विहार जैन परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक प्रवास मानला जात असून, भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विहाराचे नियोजित मुक्काम आणि आहारचार्य

  • २३ जानेवारी २०२६ : पैठण येथून विहारास प्रारंभ → ढोरकिन (यश लॉन्स) येथे आहारचार्य → बिडकीन येथे मुक्काम
  • २४ जानेवारी २०२६ : शेंदरवादा येथे आहारचार्य → ढोरेगाव येथे मुक्काम
  • २५ जानेवारी २०२६ : गंगापूर येथे आहारचार्य → महालगाव येथे मुक्काम
  • २६ जानेवारी २०२६ : वैजापूर येथे आहारचार्य → पुढील मुक्काम आणि मार्ग णमोकार तीर्थाकडे निश्चित