संकटहरण पार्श्वनाथ भगवानच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होणार
नेवासा ( जैन टुडे प्रतिनिधी )
भानसहिवरा (ता. नेवासा, जि. अहमदनगर) — श्री १००८ संकटहरण पार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, भानसहिवरा येथे ११वा वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. या निमित्ताने पूज्य प.पू. श्री गोयमसागरजी महाराज यांच्या ११व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचा मुख्य दिवस माघ शु. पौर्णिमा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ असून, सकाळ पासून पंचामृत अभिषेक, विधिपूर्वक पूजन, विधान पूजन आणि विशेष धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. या अतिशय क्षेत्राला दीर्घ धार्मिक परंपरा असून, स्व. आचार्य १०८ श्री सन्मतीसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने येथील विकास झाला आहे. भाविकांच्या श्रद्धेने अनेक मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव येथे वारंवार सांगितले जातात. या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त पालखी यात्रा, पूजन, भगवान पार्श्वनाथ बाबांचा पंचामृत अभिषेक, विधान पूजन तसेच भंडारा महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी मंगल कार्यक्रम, धार्मिक प्रवचने आणि सामूहिक सहभागाचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज, भानसहिवरा तसेच नियोजित ट्रस्ट कमिटी यांच्या वतीने करण्यात आले असून, अधिकाधिक भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दर्शन, पूजन आणि पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा यात्रा महोत्सव श्रद्धा, सेवा आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरणार असून, परिसरातील तसेच राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

