कुंडळमध्ये प्रथमच श्रीधरस्वामी प्रतिमेची प्रतिष्ठा;पंचकल्याणक महामहोत्सवात देशभरातून लाखो भाविक दाखल होणार!

सांगली :

जैन धर्मातील एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा साकार होत आहे! सांगली जिल्ह्यातील कुंडळ (ता. पलूस) येथे श्रीधरगिरी येथे भारतात प्रथमच श्री १००८ अंतिम श्रुतकेवली श्रीधर स्वामी यांच्या प्रतिमेची भव्य प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने श्री १००८ भगवान पार्श्वनाथ, श्री १००८ भगवान महावीर आणि श्रीधर स्वामी यांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

परम पूज्य निर्यापकाचार्य आशु कवी १०८ श्री उत्तमसागरजी महाराज, परम पूज्य १०८ आचार्य श्री विदेहसागरजी महाराज
परम पूज्य १०५ ऐलक वात्सल्यसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्य व मार्गदर्शनात होणार आहे. हा महोत्सव श्रीधरगिरी कुंडळ (पूर्व पाटण) – कुंभारगाव रोड येथे पार पडणार आहे. या महोत्सवात जैन समाजातील परमपूज्य आचार्य, उपाध्याय, मुनिराज, आर्यिका माता यांच्यासह विविध धार्मिक संप्रदायांचे संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवामध्ये पंचकल्याणक विधी – गर्भ, जन्म, दीक्षा, केवल ज्ञान आणि मोक्ष कल्याणकांचे भव्य दर्शन, इंद्रसभा आणि इंद्राण्यांची भूमिका, धार्मिक शोभायात्रा – भक्तिमय मिरवणूक, प्रवचनमाला आणि धर्मोपदेश, भव्य सांस्कृतिक व भक्तीपर कार्यक्रम होणार आहेत. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समिती आणि समस्त दिगंबर जैन समाज, कुंडळ (पाटण) यांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.