इंदापूर (पुणे) दि. १ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे अल्पसंख्याक बहुल ग्रामीण विकास निधीतून मंजूर झालेल्या जैन सांस्कृतिक हॉल इमारतीचे भूमिपूजन माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.२५ डिसेंबर ) रोजी झाले. या सांस्कृतिक हॉलसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या हॉलमुळे जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. तसेच गावातील सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
श्री चंद्रप्रभु महाराज दिगंबर जैन देवस्थान ट्रस्ट, निमगाव केतकी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि अध्यक्षस्थान माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किशोर शहा, मिहीर गांधी, डॉ. श्रेणीक शहा तसेच इतर सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष संतोषकुमार रतनचंद व्होरा आणि उपाध्यक्ष अभयकुमार विलासचंद गांधी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कृषी मंत्री भरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. हा सांस्कृतिक हॉल जैन समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच नव्हे, तर गावातील सर्व समाजाच्या एकत्र येण्याचे केंद्र बनेल. यामुळे सामाजिक ऐक्य मजबूत होईल आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारसा जपला जाईल. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हॉल पूर्ण झाल्यानंतर धार्मिक प्रवचन, सामाईक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ आणि सामाजिक उपक्रमांसाठी मोठा उपयोग होईल. अल्पसंख्याक विकास निधीतून मिळालेल्या या मदतीबद्दल ट्रस्टने शासनाचे आभार मानले. निमगाव केतकीतील जैन समाज आणि ग्रामस्थांमध्ये या प्रकल्पामुळे उत्साहाचे वातावरण आहे. हा हॉल लवकरात लवकर पूर्ण होऊन समाजाच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(वृत्त : स्थानिक प्रतिनिधी)

