फलटण : जैन धर्मातील तप, त्याग आणि अहिंसेच्या पथावर चालणाऱ्या संतांचा एक अनोखा प्रवास आज पुन्हा एकदा भाविकांच्या डोळ्यांसमोर येत आहे. परमपूज्य आचार्य श्री १०८ सुविधीसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली १२ पिच्छी ससंघाचा मंगल विहार श्रवणबेलगोलाच्या पावन भूमीतून सुरू झाला असून, हा विहार णमोकार तीर्थ (मालसाने, ता. चांदवड, जि. नाशिक) पर्यंत चालू राहणार आहे.
शनिवारी (ता.१० ) रात्रीचा मुक्काम ढवळ पाटी येथे करून , रविवारी ( ता. ११ ) सकाळी आहारचर्या वाठार निंबाळकर (बस स्टॉप शेजारी) येथे झाली आहे. त्यानंतर दुपारी २:०० वाजता मंगल विहार फलटणकडे सुरू झाला. दुपारी ३:०० वाजता हरीणारायण टेकडी येथे आणि ३:३० वाजता श्री १००८ आदिनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, फलटण येथे भव्य मंगल प्रवेश झाला. श्रवणबेलगोला हे जैन धर्माचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून, येथील भगवान बाहुबलीची ५८ फूट उंच एकशिल्प प्रतिमा जगप्रसिद्ध आहे. या पावन भूमीतून सुरू झालेल्या या विहारात आचार्यश्रींच्या सान्निध्यात भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा आणि मार्गदर्शन मिळणार आहे. णमोकार तीर्थ हे आता महाराष्ट्रातील एक उभरते जैन तीर्थस्थळ असून, णमोकार महामंत्रावर आधारित हे भव्य क्षेत्र आस्था, शिक्षण आणि सेवेचे केंद्र बनले आहे.

