१४५२ उपवासांच्या गणधर व्रताची साक्षीदार ठरली लाखो भाविकांची उपस्थिती
राजिम (छत्तीसगड), दि. २४
छत्तीसगडमधील राजिम येथे जैन धर्मातील तप, त्याग आणि आत्मसाधनेचा एक अतुलनीय आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला. परमपूज्य पट्टाचार्य श्री १०८ विशुद्धसागरजी मुनिराज यांचे परम प्रभावक शिष्य, परम तपस्वी डॉ. मुनिश्री १०८ अनुत्तरसागरजी महाराज यांनी जिन सहस्त्रनाम व्रतांतर्गत १००८ उपवास पूर्णत्वानिमित्त तसेच गणधर व्रताच्या १४५२ उपवासांच्या धारणेच्या निमित्ताने शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी भव्य महापारणा सोहळा साजरा केला.
दीर्घकालीन कठोर तपश्चर्या, अत्यंत संयम, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेचा हा अद्वितीय क्षण जैन धर्माच्या तपपरंपरेतील एक मैलाचा दगड मानला जात आहे. मुनिश्री अनुत्तरसागरजी महाराजांनी केलेल्या या अतुलनीय तपाने संपूर्ण जैन समाजात प्रेरणा आणि श्रद्धेचा संचार केला असून, त्याग, संयम आणि आत्मसाधनेचा संदेश समाजमनात गहिरा रुजला आहे.
या महापारणेच्या पावन प्रसंगी देशभरातून असंख्य श्रावक-श्राविका, धर्मप्रेमी भाविक आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राजिम परिसरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी मुनिश्रींच्या चरणी श्रद्धांजली वाहिली आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा भाग्य लाभ घेतला. “मुनिश्री अनुत्तरसागरजी महाराजांच्या या तपपूर्ण जीवनाने जैन धर्मातील तपाची उंची पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे. अधिकाधिक धर्मबंधू-बहिणींनी राजिम येथे उपस्थित राहून या महोत्सवात सहभाग घ्यावा,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सोहळ्यामुळे जैन समाजातील तरुण पिढीला तप, त्याग आणि आत्मशुद्धीच्या मार्गाचे नवे प्रेरणास्थान मिळाले असून, राजिम हे ठिकाण आता जैन तपपरंपरेचे एक नवे केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.

