३९ उमेदवार विजयी; पुणे-मुंबईत विशेष कमाल,
पुणे, दि. २१
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुका २०२६ मध्ये जैन समाजाने उल्लेखनीय कामगिरी करत ३९ उमेदवारांना विजयी करून दाखवले आहे. विविध राजकीय पक्षांच्या तिकिटावर लढलेल्या या उमेदवारांनी मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला असून, राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जैन समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व मजबूत झाले आहे.
पुणे महानगरपालिकेत जैन उमेदवारांनी विशेष यश मिळवले. भारतीय जनता पक्षाकडून बाळासाहेब ओसवाल (प्रभाग ३३), मनीषा चोरडिया (प्रभाग २) आणि सपना झाडे (प्रभाग ६) यांनी विजय मिळवला. या यशामुळे पुण्यात जैन समाजाच्या आवाजाला अधिक ताकद मिळाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्येही जैन उमेदवारांची घवघवीत कामगिरी दिसली. निशा शाह, हिमांशु पारख, धवल डोशर, सुनीता राजेश मेहता, हेतल गाला, कल्पेशा जेसल कोठारी, गौरांग चेतन जवेरी यांसह अनेकांनी विविध प्रभागांतून विजय मिळवला. मुंबईसारख्या महानगरात जैन समाजाचे हे यश समाजाच्या राजकीय ताकदीचे द्योतक आहे. याशिवाय मीरा-भाईंदर, भिवंडी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि नागपूर या महानगरपालिकांमध्येही जैन उमेदवारांनी विविध पक्षांच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या एकूण ३९ विजयांमुळे जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी प्रश्नांना महापालिकांच्या निर्णयप्रक्रियेत प्रभावीपणे मांडता येणार आहे. समाजाच्या विकासासाठी हे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जैन समाजातील विविध संघटना, व्यापारी मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे यश जैन समाजाच्या राजकीय जागृती आणि एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे.

