सम्मेद शिखरजी रोपवे प्रकल्प पूर्णपणे रद्द;
जैन समाजात समाधानाची लाट
नवी दिल्ली, दि. २३
झारखंडमधील पारसनाथ पर्वतावरील सम्मेद शिखरजी – जैन धर्मातील सर्वोच्च आणि अतिपवित्र तीर्थक्षेत्र – येथे प्रस्तावित असलेला रोपवे (रज्जुमार्ग) प्रकल्प आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही अधिकृत माहिती दिली असून, या निर्णयामुळे जैन समाजात समाधान आणि आनंदाची लाट पसरली आहे.
लोकसभा खासदार शंकर लालवाणी यांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्राच्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी १५ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, सम्मेद शिखरजी पर्वतावरील रोपवे प्रकल्पाचा सखोल अभ्यास करण्यात आला. या प्रकल्पाचा सामाजिकदृष्ट्या विचार केल्यानंतर तो अनुकूल नसल्याचे निष्कर्ष निघाले असून, प्रकल्प स्थगित करून पूर्णपणे रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मातील २० तीर्थंकरांच्या निर्वाण स्थळांपैकी २० पैकी २० ठिकाणे असलेले एकमेव पर्वत आहे. या पवित्र स्थळावर रोपवे किंवा यांत्रिक वाहतुकीमुळे धार्मिक परंपरा, शांतता, पर्यावरणीय संवेदनशीलता आणि तीर्थयात्रेच्या पावित्र्याला धक्का बसण्याची भीती जैन समाजातून सातत्याने व्यक्त होत होती.
लाखो जैन अनुयायी आणि विविध संघटनांनी या प्रकल्पाविरोधात गेल्या काही वर्षांत तीव्र आंदोलने, निवेदने आणि कायदेशीर लढा दिला होता. या निर्णयानंतर जैन समाजातील प्रमुख संघटना, आचार्य-मुनिराज आणि लाखो भाविकांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्र सरकारचे आभार मानले जात आहेत. “धार्मिक भावना, परंपरा आणि पर्यावरणाचे रक्षण करणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. जैन समाजाच्या श्रद्धेला न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया अनेक जैन नेत्यांनी व्यक्त केली आहे.
हा निर्णय धार्मिक स्थळांच्या पावित्र्याचे संरक्षण आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, देशभरातील जैन समाजातून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.

