नाशिक, दि. १ : दिगंबर जैन संप्रदायाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी पंचकल्याणक प्रतिष्ठा २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थ येथे भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवात जिनशासनाची भव्य प्रभावना होणार आहे.
या पंचकल्याणक प्रतिष्ठेतील सर्वात मानाचा आणि सर्वोच्च पदाचा मान म्हणजे सौधर्म इंद्र होण्याचा बहुमान उस्मानाबाद येथील नीलमकीर्ति अजमेरा यांना मिळाला आहे.
जैन परंपरेनुसार पंचकल्याणक महोत्सवात सौधर्म इंद्राची भूमिका ही अत्यंत पवित्र आणि प्रतिष्ठेची मानली जाते. या भूमिकेसाठी निवड होणे हे समाजातील व्यक्तीच्या दान, धर्म आणि सेवेच्या कार्याची उच्च पातळी दर्शवते.
णमोकार तीर्थ हे नव्याने विकसित होत असलेले भव्य जैन तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्माच्या मूल मंत्र णमोकारवर आधारित हे तीर्थक्षेत्र आस्था, शिक्षण आणि सेवेचा अनोखा संगम घडवणारे ठरणार आहे. येथे होणारी पंचकल्याणक प्रतिष्ठा दिगंबर संप्रदायातील आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याने देश-विदेशातील जैन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. नीलमकीर्ती अजमेरा हे उस्मानाबाद परिसरातील जैन समाजातील मान्यवर असून, त्यांच्या धार्मिक-सामाजिक कार्याची समाजात मोठी प्रशंसा होत आहे. सौधर्म इंद्र होण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यासह उस्मानाबादच्या जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, पंचकल्याणकाच्या पाच कल्याणकांचा (गर्भ, जन्म, तप, ज्ञान, मोक्ष) भव्य उत्सव साजरा केला जाईल. हा महोत्सव जैन धर्माच्या शाश्वत मूल्यांना नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
(वृत्त : विशेष प्रतिनिधी)

