भारताच्या पहिल्या ऑलिंपिकमॅरेथॉन धावपटूचा

आज ७४ वा स्मृतीदिन;जैन समाजाचा अभिमान असलेल्याया महान विभूतीने रोशन केले देशाचे नाव

कोल्हापूर :
भारताच्या खेळ इतिहासातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा ७४ वा पुण्यस्मृतीदिन साजरा होत आहे. दिवाण बहादूर श्री आण्णप्पा (फड्याप्पा) चौगुले हे भारताचे पहिले ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होते. १९२० साली बेल्जियमच्या अँटवर्प ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि १९ व्या स्थानासह देशाचे नाव उज्ज्वल केले.
१९०२ मध्ये बेळगाव येथे एका सधन जैन शेतकरी कुटुंबात जन्मलेले फड्याप्पा दरेप्पा चौगुले (पी. डी. चौगुले) हे केवळ १८ वर्षांच्या वयात ऑलिंपिकमध्ये धावले. त्याकाळात भारताने तब्बल २० वर्षांनंतर परदेशात ऑलिंपिकमध्ये संघ पाठविला होता. त्यांनी दाखवलेल्या धैर्याने, चिकाटीने आणि वेगाने लाखो भारतीयांना प्रेरणा दिली. जैन समाजातील हे एकमेव खेळाडू होते ज्यांनी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, ही बाब जैन धर्मीयांसाठी विशेष अभिमानाची आहे.

ऑलिंपिकनंतरही चालू ठेवली
सामाजिक-धार्मिक कामगिरी..
ऑलिंपिक यशानंतर त्यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील जैन समाजाच्या शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अमूल्य योगदान दिले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या या बहुमूल्य कार्याबद्दल ‘दिवाण बहादूर’ ही प्रतिष्ठित पदवी बहाल केली. ही पदवी त्या काळात निष्ठावान सेवा आणि लोककल्याणासाठी दिली जायची. चौगुले हे कोणत्याही संस्थानिक किंवा राजाचे दिवाण नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे नेते, शैक्षणिक पुरस्कर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते होते. दुर्दैवाने अवघ्या ५० व्या वर्षी १६ जानेवारी १९५२ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.