सिस्साईड येथे भव्य वेदी प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक

मुंबई, दि. २८

पुण्यदेय अतिशय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्साईड (मुंबई) येथे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात भव्य वेदी प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसांचा धार्मिक महोत्सव शुक्रवार ६ मार्च ते रविवार ८ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे.

या पावन समारंभाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले असून, परमपूज्य आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज आणि आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादासह मुनिश्री १०८ अजितसागरजी महाराज, मुनिश्री नीरजसागरजी महाराज आणि ऐलक श्री शिवानंद सागरजी महाराज यांची पावन उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात विविध दानशील श्रावक-श्राविकांसाठी विशेष सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मूलनायक अभिषेक, वेदी पूजन, यागमंडल, शांतिधारा, ध्वजारोहण अशा अनेक सेवांचा समावेश आहे.
सिस्साईड येथील हा महोत्सव मुंबईतील जैन समाजासाठी एक विशेष आध्यात्मिक घटना ठरणार असून, राज्याबाहेरूनही हजारो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक धर्मप्रेमी बांधव-बहिणींनी या पवित्र सोहळ्यात सहभाग घेऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सिस्साईड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, नवीन वेदी प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेकामुळे भगवान अजितनाथांच्या कृपेचा प्रसाद सर्वांना लाभणार आहे.

  • महोत्सवातील प्रमुख विधी
  • ६ मार्च (शुक्रवार) : घटयात्रा, ध्वजारोहण, मंडपशुद्धी, प्रवचने
  • ७ मार्च (शनिवार) : अभिषेक, शांतिधारा, नित्यपूजन, यागमंडल वेदी संस्कार
  • ८ मार्च (रविवार) : अभिषेक, पूजन, नवीन वेदी व जिनप्रतिमा प्रतिष्ठा, मूलनायक भगवान श्री अजितनाथ यांचा महामस्तकाभिषेक, गुरू स्मारक स्थापना